'पाकिस्तान जिंदाबाद' चा नारा घातल्याने युवकाचा मृत्यू; मंगळुरूमधील संतप्त जमावाची हिंसक प्रतिक्रिया

 'पाकिस्तान जिंदाबाद' चा नारा घातल्याने युवकाचा मृत्यू; मंगळुरूमधील संतप्त जमावाची हिंसक प्रतिक्रिया

📅 दिनांक: 30 एप्रिल 2025 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात रोष; मंगळुरूमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्या युवकावर जमावाकडून हल्ला

कर्नाटक | पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली असून, याचा परिणाम मंगळुरू येथे पाहायला मिळाला. क्रिकेट सामन्यादरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद' असा नारा दिल्याने एका युवकावर जमावाने बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना रविवारी मंगळुरूमधील कुडूपू येथील भात्रा कल्लुर्ती मंदिराजवळ घडली. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान युवकाने पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिली होती, ज्यावर संतप्त जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. प्रत्यक्षदर्शींनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तरीही जमाव थांबला नाही.

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी याबाबत माहिती दिली असून, पोलिसांनी 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यातील 15 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.

मृतदेह ग्रामीण पोलिसांना सोमवारी संध्याकाळी 5.30 वाजता सापडला. मंगळुरूचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तपास सुरु असल्याचे स्पष्ट केले आहे.

या घटनेने समाजमाध्यमांवरही प्रचंड खळबळ उडवली आहे. एकीकडे पाकिस्तानविरोधातील चीड वाढत असताना, दुसरीकडे देशात कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

Comments